शेतीतील गांडुळाचे महत्व
गांडुळ हा शेतकर्यांचा मित्र आहे, असे शिकत आलो आहोत. परीक्षेत एक मार्क मिळण्यासाठी हे उत्तर उपयोगी पडते पण, प्रत्यक्षात शेती व्यवसाय करताना गांडुळ १०० मार्का इतका महत्त्वाचा आहे. आपण मात्र आपल्या या मित्राला विसरून शेती करीत आहोत. केवळ विसरूनच नव्हे तर त्याची उपेक्षा करून शेती करायला लागलो आहोत. एकवेळ तेही ठीक आहे पण आपण जिला शेतीची आधुनिक पद्धत म्हणतो ती तर आपल्या या मित्राच्या जीवावर उठणारी आहे. पुस्तकात आणि परीक्षेत गांडुळाला आपला मित्र म्हणायचे आणि प्रत्यक्षात शेती करताना त्याचा जीव घेणारी शेती करायची, अशी शेती यशस्वी कशी होईल ? गांडुळाला विसरून चालणार नाही. त्याची ओळख करून घ्यावी लागेल. त्याचा कसा आणि किती फायदा करून घेता येईल याचा विचार करावा लागेल. गांडुळ हा प्राणी कधी निर्माण झालाय याबाबत मतभेद आहेत पण तो माणसाच्या पूर्वी या सृष्टीत अवतरला आहे असे मानले जाते. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत.
गांडूळ हा एकलिंगी प्राणी आहे.
म्हणजे एकाच गांडुळाचा निम्मा भाग नर असतो तर निम्मा भाग मादीचा असतो. त्यामुळे प्रत्येक गांडुळ अंडी घालत असतो आणि त्याची पैदासही मोठी असते. गांडुळ हा दवणे, वाळे, गेचवे, शिंदाडे, काडू इत्यादी नावांनी ओळखला जातो. जगभरामध्ये गांडुळाच्या ३ हजार जाती असून त्यातल्या ३०० जाती भारतामध्ये आहेत. गांडुळाची लांबी एक इंचापासून अगदी ८ ते १० इंचापर्यंत असते. गांडुळाचा जीवनक्रम, त्याच्या सवयी, त्याचे शरीर आणि त्याच्या पोटातली भट्टी या सर्वांचा अभ्यास केला असता या सर्व बाबी शेतीसाठी अतिशय उपकारक असल्याचे आढळले आहे. गांडुळ जन्मभर शेतकर्यांसाठी काम करत असतो. तसे माणूसही काम करतो परंतु माणूस आठ तास ड्युटी करतो. गांडुळ मात्र चोवीस तास ड्युटी करत असतो. विशेष म्हणजे त्या बदल्यात तो कसलाही पगार मागत नाही. करोडो रुपयांची गुंतवणूक करून एखादा कारखाना उभा केल्यानंतर त्यातून जेवढे रासायनिक खत तयार होईल त्यापेक्षा किती तरी जास्त आणि किती तरी उपयुक्त खत गांडुळ आपोआप निर्माण करत असतो.
गांडुळाची ओळख करून घ्या
गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही. कारण त्याला डोळे नसतात. त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते. जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते. ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते. परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते. निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे. या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते. त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते. अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते. तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते. ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना हवा भरपूर मिळते. पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
हे सारे करत असताना जमिनीतली माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळतो. विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो. गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते. त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो. मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात. गांडुळांची जन्म-मरणाची साखळी सुरू असते. शेकडो पिलांना जन्म देऊन एखादे गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकर्यांच्या उपयोगी पडते. गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो. त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के इतके प्रोटिन्स किंवा प्रथिने असतात. त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते. गांडुळाचा खत म्हणजे प्रामुख्यानेगांडुळाची विष्ठा.
या विष्ठेचे विश्लेषण केले असता त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फूरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत. जमिनीमध्ये सर्वसाधारणत: जेवढे जीवाणू असतात त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात. तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस् असतात. हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात. त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात आणि पिकांवर पडणार्या रोगांवर इलाज करतात. गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे. त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात. गांडुळाचे हे सारे गुणधर्म पाहिले म्हणजे गांडुळ हा शेतकर्यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल आणि गांडुळाची मदत घेऊन शेती करणे कसे बिनखर्ची शेती करण्यास उपयोगाचे आहे हेही ध्यानात येईल. गांडुळाचे आणखी काही महत्वाचे उपयोग आहेत. ते पाहिले म्हणजे गांडुळाला वगळून शेती करणे हा किती मोठा अपराध आहे आणि हा अपराध करून आपण आपल्याच पायावर कसा दगड मारून घेत असतो हे लक्षात येईल.
आपल्या शेतात आपण पिकांना रासायनिक खते देतो. अशी तयार खते बाजारात मिळतात आणि ती पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे पिकांना ती दिली की, पाण्यात विरघळून तयार झालेले खतयुक्त पाणी झाडांची किंवा पिकांची मुळे शोषून घेतात. ही सारी प्रक्रिया एक-दोन दिवसात घडते. त्यामुळे रासायनिक खते पिकांना ताबडतोब लागू होतात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते. शेणखत किंवा गावखत यांची अवस्था अशी नसते. ती पटकन शोषून घेता येत नाहीत. शेतात पडलेले शेणखत, काडी-कचरा हे खत म्हणून पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नाहीत. मात्र ही खते किंवा शेतातले कोणतेही सेंद्रीय पदार्थ आधी गांडूळ खातो. त्याच्या पोटात निसर्गाने ठेवलेल्या भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते. ती खतयुक्त विष्ठा मात्र पाण्यात पटकन विरघळते आणि ते विष्ठायुक्त खत मात्र पिकांच्या मुळांना शोषून घेता येते. म्हणजे ही सारी प्रक्रिया घडायला काही वेळ लागतो. म्हणूनच आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रीय खते पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नसतात. परंतु ती पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम गांडूळ करत असतो. म्हणजे गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे. हा भटारखाना म्हणजे खताचा कारखाना सुद्धा आहे.
गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते भस्त करत असते. म्हणजे आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोेग दवाखाना म्हणून होत असतो. अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात. कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते. कीडींमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधे मारावी लागतात. त्या औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो. अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते. पहिला खर्च रासायनिक खताचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि औषधांचा. गांडूळ बिळ करून राहते आणि त्यासाठी माती उकरत राहते. त्याच्या या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातली माती वर येते आणि वरच्या थरातली माती खाली नेऊन सोडली जाते. मातीची ही अदलाबदल मृदशास्त्रानुसार पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारे काम कसलाही पगार न घेता करत असते.
नोट: सदरची पोस्ट हि व्हाट्सअँप च्या कृषिसमर्पण या ग्रुपवरून कॉपी करून पोस्ट करण्यात आली आहे.
कृषिदूत हा ब्लॉग शेतीसंभंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बनवण्यात आला आहे.

Ho, khup mahatvacha ahe . Mala he mahit nhavta. Dhanyavaad.
ReplyDeleteBhai mla seminar & environment cha project karnyasathi patje hot dhanyavad kdk
DeleteI need gandul khat project in Marathi
ReplyDeletety sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletevery good ..nice post
ReplyDeleteThank you for shared detailed information of Importance of Earthworn at Farming... Looking for Gandul Khat Project detailed information in Marathi Online ..
ReplyDelete